पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी “पीएमआरडीए’कडून विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चित्रपटगृहासमोरील उड्डाणपूल पाडण्यात आले आहेत. मात्र, यामुळे या रस्त्याच्या दोन्ही साईडपट्ट्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह, अपघात वाढत असून हा रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हे काम “पीएमआरडीए’चे असल्याने त्यांनीच रस्ता दुरूस्त करून द्यावा, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच करोनामुळे महापालिकेकडे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने पूल जमीनदोस्त करणाऱ्या ठेकेदाराकडूनच हा खर्च घ्यावा, अशी भूमिका पथ विभागाने घेतली आहे.
हा मेट्रो मार्ग विद्यापीठ रस्त्यावरून जात असल्याने या मार्गात अडथळा ठरणारा उड्डाणपूल “पीएमआरडीए’ने हटवला आहे. त्यानंतर अद्याप या मेट्रो मार्गाचे काम सुरू झालेले नाही. दरम्यान, हा उड्डाणपूल दोन महिन्यांपूर्वी पाडण्यात आला. त्यानंतर काही रस्त्याची दुरुस्ती महापालिकेने केलेली आहे. मात्र, या कामात या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्टया खराब झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरूस्त करण्याच्या सूचना पोलिसांनी महापालिकेस केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर हा रस्ता “पीएमआरडीए’ने दुरूस्त करून देण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबतचे पत्र “पीएमआरडीए’ला पाठवण्यात येणार आहे.
भविष्यातील दुरुस्ती ठरणार महागडी?
या चौकात लवकरच तीन मजली उड्डाणपुलाचे काम सुरू होणार हा पूल विद्यापीठ चौक ते ई- स्क्वेअरपर्यंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात नादुरुसत होण्याची शक्यता आहे. शहरात सध्या मेट्रोच्या इतर मार्गांत रस्त्यांची स्थिती वाईट असून हे दुरूस्त करण्यासाठी यावर्षी पालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे महापालिकेने या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर भविष्यात खराब होणाऱ्या रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी “पीएमआरडीए’ने घ्यावी, अन्यथा पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदराकडे असावी, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.