कोलकाता – कर्णधार व स्टार खेळाडू सुनील छेत्री याने फटकावलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने आशियाई पात्रता फुटबॉल स्पर्धेत कंबोडियावर 2-0 असा विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने या स्पर्धेची पात्रता जवळपास निश्चित केली आहे.
येथील सॉल्टलेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात छेत्रीने केवळ दोन गोल केले नाहीत तर त्याने एक विक्रमही आपल्या नावावहर जमा केला. या सामन्यात पहिल्याच हाफमध्ये छेत्रीने मिळालेल्या पेनल्टीचा पुरेपुर लाभ घेत 14 व्या मिनिटाला गोल केला व संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसरा हाफ सुरु झाल्यावर 60 व्या मिनिटाला त्याने अफलातून हेडरद्वारे संघाचा व आपला दुसरा गोल केला व 2-0 अशा भक्कम आघाडीसह विजय निश्चित केला. यानंतर भारतीय संघाने कंबोडियाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही व सामना सहज जिंकला.
छेत्रीने या दोन गोलसह जागतिक क्रमवारीत 106 व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाची प्रतिष्ठा राखली. या दोन गोलच्या जोरावर छेत्रीने 127 व्या आंतरराष्ट्रीय लढतीत आपले 82 गोल नोंदवले. अशी कामगिरी करणारा छेत्री जगातील केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे.
गेल्या महिन्यातच छेत्रीने अमिरातीच्या अली मखबौतच्या 77 गोलच्या कामगिरीला मागे टाकले होते. आता त्याच्यापुढे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (117 गोल) व अर्जेन्टिनाचा लिओनेल मेस्सी (86 गोल) आहे. आता भारतीय संघाचा या पात्रता फेरीतील पुढील सामना अफगाणिस्तानशी येत्या शनिवारी होणार आहे.