शेवगाव (प्रतिनिधी) – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांना अमेरिकेच्या ग्लोबल ह्यूमन राईट कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचा ‘एशिया पॅसिफिक आयकॉनिक अवॉर्ड’ हा पुरस्कार जाहीर झाला. येत्या दि. 11 डिसेंबरला सायंकाळी सातला बँकॉक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ग्लोबल ह्यूमन राइट्स कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचे चेअरमन डॉ. साल्हटोर मोकिया यांनी गेल्या 16 नोव्हेंबरला डॉ. भालेराव यांना पत्र पाठवून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकॉकला येण्यासाठी निमंत्रित केले आहे.
देशातील नऊ राज्यात तब्बल 127 शाखांच्या विस्ताराद्वारे बँकिंग व्यवस्थापन क्षेत्रात निष्ठापूर्वक केलेल्या विशेष कामगिरीची तसेच विविध सामाजिक क्षेत्रात अर्थतज्ज्ञ डॉ.भालेराव सातत्याने करत असलेल्या समाज उपयोगी कार्याची दखल या संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने घेतली आहे.
डॉ. भालेराव यांची ही उत्तुंग कामगिरी समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणादायी व स्फूर्तीदायक ठरत असल्याचे कौतूक देखील चेअरमन डॉ. मोकिया यांनी केले आहे.