पिंपरी (प्रतिनिधी) – टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत… विणेच्या झंकारात, ज्ञानोबा-तुकारामचा अखंड जयघोष अन् भक्तांच्या उत्सवाला आलेल्या उधाणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे औद्योगिकनगरीत रविवारी (दि.11) सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या उत्साहात आगमन झाले. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी पिंपरी-चिंचवडनगरी दुमदुमून निघाली आहे. निगडीतील भक्ती शक्ती चौकात भाविकांचा अभूतपूर्व असा उत्साह दिसून येत होता.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि.10) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदार वाड्यात झाला. रविवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी दिंडी प्रमुखांना पालिकेच्या वतीने कापडी शबनम पिशवी, त्यामध्ये माहिती पुस्तिका, आरोग्य किट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश लांडगे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मुख्य रथाचे सारथ्य देखील केले.