Asaduddin Owaisi : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. हमासच्या हल्लानंतर इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव केला आहे. या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे.
हमास-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझामधील लोकांच्या बाजुने उभं राहण्याची आणि इस्रायल-हमास युद्धात होरपळलेल्या हजारो निष्पाप लोकांना मदत करावी, असे आवाहन केले आहे.
#WATCH | Hyderabad: On the Israel-Palestine conflict, AIMIM chief Asaduddin Owaisi says, “The poor people of Gaza, with a population of 21 lakh, 10 lakh have been rendered homeless…The world is silent…For 70 years Israel has been an occupier…You cannot see the occupation,… pic.twitter.com/9riNvVEOV1
— ANI (@ANI) October 15, 2023
“मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहीन. आजही इस्रायलविरोधात लढणाऱ्या गाझातील लाखो शूरवीरांना माझा सलाम! नेतान्याहू (इस्रायली पंतप्रधान) हा एक जुलमी सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील एक बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील. तर मी त्या बाबा मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मी आपल्या तिरंग्यासह अभिमानाने पॅलेस्टाईनचा झेंडाही धारण करतो. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे,” असे विधान ओवेसी यांनी केले. ते हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.
“मला पंतप्रधानांना पॅलेस्टिनींवर होणारे अत्याचार थांबवण्याचं आवाहन करायचं आहे. पॅलेस्टाईन हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही, तो एक मानवतावादी मुद्दा आहे. २१ लाख लोकसंख्या असलेल्या गाझातील १० लाख गरीब लोक बेघर झाले आहेत. पण जग शांत आहे. ७० वर्षांपासून इस्रायल पॅलेस्टाईनवर ताबा मिळवत आहे. इस्रालयने केलेला ताबा तुम्हाला दिसत नाहीये का? पॅलेस्टिनींवरील अत्याचार तुम्हाला दिसत नाहीत का? ” असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.