पिंपरी, (प्रतिनिधी) –उन्हाचे चटके बसू लागल्याने जानेवारीत तीस रुपये किलो रुपये दराने मिळणारे लिंबू सध्या घाऊक बाजारात 80 ते 90 रुपये किलोने मिळत आहे. किरकोळ बाजारात लिंबूने शंभरी गाठली आहे. उन्हामुळे लिंबू शिखंजी, लिंबू सरबत, रसवंती, लिंबू-सोडा यासह विविध शितपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी, लिंबूंना मागणी वाढली आहे.
शहर व परिसरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. येथे अवघ्या तीस रुपये किलोने मिळणारे लिंबु सध्या शंभर रुपये किलो दराने मिळत आहेत. काही ठिकाणी दहा रुपये नगाप्रमाणे लिंबू मिळत आहे. तर एप्रिल व मे महिन्यात लिंबाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
लिंबांची आवक घटली
यावर्षी पाणी कमी असल्याने लिंबूचे उत्पादन घटले आहे. एप्रिलमध्ये लिंबूचे दर गगनाला भिडतील. सध्या शेतकर्यांकडे पाहिजे तसा माल शिल्लक नसल्याचे चित्र आहे.