मुंबई – राज्याच्या अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यातील खड्डयांमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेवर जहरी टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे एका दौऱ्यादरम्यान शिर्डीहून मुंबईला जात असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचं सांगितलं जात आहे. या वादानंतर 23 जुलैच्या रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. या तोडफोडीवरून शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत मनसेला टोला लगावला आहे.
मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम,उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा!
— Deepali Sayed (@deepalisayed) August 19, 2023
“मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा!” असं ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. दिपाली सय्यद यांच्या या ट्वीटवर मनसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.