पिंपरी – केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत पिंपरी-चिंचवड शहरातील लक्षणे नसलेल्या मात्र करोना बाधित असलेल्या तब्बल 34 रुग्णांना एकाच दिवशी (रविवारी) घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेचा हा निर्णय दिलासादायक ठरणार की करोनाला आमंत्रण देणारा हे काही दिवसांतच कळून येईल. मात्र करोनामुक्तीचे अहवाल न घेताच या रुग्णांना सोडण्यात आल्यामुळे केंद्राच्या अध्यादेशाचा दुष्परिणामच अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी करोना बाधितांसाठी नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यापूर्वी प्रत्येक करोना बाधित व्यक्तीला 14 दिवस सक्तीचे उपचार दिले जात होते. त्याशिवाय 14 दिवसानंतर संबंधिताच्या घशातील द्रवाचे नमुणे दोन वेळा तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. दोन्ही वेळचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतरच संबंधिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत होता. मात्र आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 14 दिवसांच्या कालावधीचा उल्लेख हटविण्यात आला असून सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी करोना बाधित व्यक्तीला ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला अथवा तत्सम करोनाची लक्षणे नसल्यास त्याला दहाव्या दिवशी घरी सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ज्या व्यक्तीला तीन दिवस लक्षणे आढळणार नाहीत त्याची चाचणी केली जाणार नसून थेट घरी सोडले जाणार आहे. याच मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 90 रुग्णांपैकी तब्बल 34 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांची उपचारानंतरही कोणतीही करोना तपासणी न करताच त्यांना सोडण्यात आल्यामुळे हे 34 जण अद्यापही बाधित आहेत की ते करोनामुक्त झाले आहेत, याबाबत कोणतीही शहानिशा करण्यात आलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांना डिस्जार्ज देण्याची तसेच तपासणी न करता घरी पाठविण्यात आल्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. आज बाधितांपैकी 34 जणांना सोडण्यात आल्यामुळे करोनाचे 57 सक्रिय रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत.
घरी सोडण्यात आलेल्यापैकी काहीजण बाधित असल्यास त्यांच्या संपर्कात येणार आणखी काहीजण बाधित होण्याची भीती व्यक्त होत असून केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतलेला हा निर्णय दिलासादायक म्हणायचा की करोनाला आमंत्रण म्हणायचे याबाबत आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
लक्षणे दिसणारे रुग्ण अल्प
करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 60 ते 75 टक्के रुग्णांना करोनाबाबतची कोणतीच लक्षणे आढळून आलेली नाहीत. साधी शिंक, खोकला अथवा तापही न आलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. तर करोनाची लक्षणे आढळून येणारे रुग्ण बोटावर बोजण्याइतपतच आहेत. ज्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती अधिक आहे त्याला लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र बाधित व्यक्ती प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यास बाधितांची संख्या लक्षणीय वाढण्याची तसेच ज्येष्ठांना व लहान मुलांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
केंद्राच्या सूचनेनुसार निर्णय – डॉ. साळवे
केंद्र शासनाने कालच (शनिवारी) करोना बाधितांसदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार निर्णय घेऊन करोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेची अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. तीन दिवस ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत त्या 34 जणांना डिस्जार्ज देण्यात आला असून त्यांना सात दिवस सेल्फ होम क्वारंटाईन करण्याबाबत सांगण्यात आले आहे. घरी सोडल्यानंतर काही लक्षणे आढळल्यास पुन्हा रुग्णालयात येण्याबाबतही त्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती साळवे यांनी दिली.