पिंपरी – पिंपरी चिंचवड महापलिकेच्या 22 शाळांना पुरेसे मैदान आणि जागा नसल्याने २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट रोजी ध्वजवंदन करण्यास अडथळे येत आहेत. परिणामी उपलब्ध जागेमध्येच शाळा व्यवस्थापनाला नियोजन करावे लागत आहे. या वेळी विद्यार्थ्यांना वर्गातूनच ध्वजवंदनासाठी उपस्थिती लावावी लागत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या सुमारे २२ शाळांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. या शाळेत सर्वसामान्य गोरगरीब मुले शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे कल आहे. क्रीडा कार्यक्रमाबरोबरच शाळांमध्ये प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
या वेळी शाळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. मात्र, २२ शाळांना मैदाने आणि पुरेशी जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी कुठे उभे राहायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा शाळांमध्ये शिक्षक आणि ठरावीक विद्यार्थ्यांवरच ध्वजवंदन करून घेण्याची वेळ येत आहे. विद्यार्थ्यांना बोलावलेच तर त्यांना वर्गातूनच उपस्थित राहण्यास सांगण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे. त्यामुळे शाळांना मैदानाची अथवा पुरेशा जागेची सोय कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे.
डिजिटल शिक्षणाकडे शाळांचा कल आहे. मात्र, काही विद्यार्थी हे क्रीडा निपुण आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच चांगली क्रीडांगणे असतील तर त्यांचा सरावही उत्तम होईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी शाळांना मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे खेळाडू सांगतात. महापालिकेच्या मराठी, उर्दू, प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. या दोन ते तीन शाळांना एकच मैदान वापरले जाते. तर काही शाळांची मैदाने छोटी आहेत. यामध्ये शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी हे चारचाकी वाहने घेऊन येतात. ही वाहने शाळेतील मैदानावरच पार्क केली जातात.
ज्या शाळांना मैदाने नाहीत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन ध्वजवंदन करण्यात अडथळे येत आहेत. मात्र, उपलब्ध व्हरांड्यात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच वर्गातूनच विद्यार्थी ध्वजवंदन करत आहेत.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.