मुंबई -आर्यन खानच्या मोबाइलमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची आणि धक्कादायक सामग्री सापडली आहे, असा दावा अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) त्याची कोठडी मागताना केला आहे. खान, अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या मोबाइलमध्ये धक्कादायक सामग्री सापडली आहे.
त्यात खानने अमली पदार्थ मिळवण्यासाठी पैसे कसे द्यायचे, याची चर्चा केली आहे आणि त्यात अनेक कोड नावांचा वापर केला आहे. सध्या छापे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्करांसोबत आरोपींनी केलेले व्हॉटस् – ऍप चॅट उपलब्ध आहे, असा दावा एनसीबीने केला. आरोपी एकमेकांच्या संपर्कातील आहेत.
त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा तपास करण्याची गरज आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, अटक केलेल्या आरोपींना लावलेली कलमे जामीनपात्र आहेत. मात्र, ही वाईट सवय समाजातून काढून टाकण्याचा अमली पदार्थ कायद्याचा हेतू न्यायालयाने लक्षात घ्यावा.
केवळ किरकोळ अमली पदार्थ सापडले म्हणून त्यांना जामीन मिळावा, असे कोणी म्हणू शकत नाही. अंमलीपदार्थाचे सेवन ही सामान्य सवय होत आहे. महाविद्यालयात जाणारी मुलेही त्याचे सेवन करत आहेत. आरोपी हाय प्रोफाईल आहेत. ती सामान्य जनतेसाठी रोल मॉडेल आहेत, अशी पुस्तीही एनसीबीने जोडली.