मुंबई – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र सध्या गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. यावर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे यांनी गौतमीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे, त्यामुळे गौतमी पाटील यांच्यामागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. कलाकारांना संरक्षण मिळालेच पाहिजे मी याच मताचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महिलांनी आपले गुण व कर्तुत्व दाखवले पाहिजे.”
पुढे ते म्हणाले की, “मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण चालते. जाती विषमता कमी करायची असेल तर बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाला लोक कंटाळले आहेत.”
सुषमा अंधारे
याआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत गौतमीला पाठिंबा दिला होता. “माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना केला होता.
नेमका काय आहे वाद ?
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपवले असल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. “गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये, अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,” असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे. यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली होती. “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना… मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही,” असे स्पष्ट गौतमीने सांगितले होते.