कोची : करोनावर मात देण्यासाठी विविध स्तारावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, करोना बाधित बरा करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यास केरळला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सने परवानगी दिली आहे. अशा प्रकारचा प्रयोग करण्यास परवानगी मिळालेले केरळ हे पहिलेच राज्य आहे. तेथे यापुर्वीच मेडिकल टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.
या टास्क फोर्सकडून प्रथम करोना बाधित झालेल्या आणि नंतर करोनामुक्त झालेल्या रुग्णांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. कोरोना मुक्त झाल्यानंतर 14 दिवसांनी ऍन्टीबॉडिज आढळतात का याची चाचणी केली जाणार आहे. जर त्या नियमित प्रमाणापेक्षा अधिक असतील आणि जर त्या व्यक्तीचे वजन 55 किलोपेक्षा अधिक असेल तर त्याच्या पासून 800 मिली प्लाझ्मा वेगळा काढण्यात येईल. त्याचे चार भागात विभाजन करण्यात येईल. त्यातील 200 मिली अलिकडेच अत्यवस्थ होत असलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येईल, असे टास्क फोर्सचे सदस्य अनुप कुमार यांनी सांगितले.
गोळा केलेला प्लाझ्मा अनेक आठवडे जतन करता येऊ शकतो. सध्या राज्यात करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले आणि नंतर ही चाचणी निगेटिव्ह आलेले 80 जण आहेत. या ऍन्टीबॉडिजची तपासणी कोचीतील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी येथे करण्यात येणार आहे. केरळमध्ये करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 345 आहे.