नवी दिल्ली – बॅंक ऑफ इंडियाचे 82 कोटी 55 लाख रूपयांचे कर्ज बुडवून आणखी एक उद्योजक देशाबाहेर पळून गेल्याचे उघड झाले असून त्याचे नाव जतीन मेहता असे आहे. या प्रकरणी त्याच्यासह हथयाम सलमान अलि ओबैद यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
यातील ओबैद हा जॉर्डनचा नागरीक आहे असे सांगण्यात येते. मेहता याने विनसोम डायमंड ऍन्ड ज्वेलर्स कंपनीच्या नावे कर्ज घेतले होते. त्याने खोटी माहिती सादर करून हे कर्ज घेतले होते. त्याच्या कर्जबुडवेपणाची व फसवणुकीची चौकशी सुरू झाल्यानंतर तो देश सोडून पळून गेला. तो कॅरेबियन बेटांकडे निघून गेल्याचा अंदाज आहे.
बॅंकेने त्याला जानेवार 2013मध्ये हे कर्ज दिले होते अशी माहिती संबंधीत आधिकाऱ्यांनी दिली. त्याने स्टॅंडबाय लेटर ऑफ क्रेडीट पद्धतीचा वापर करून बॅंकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला बॅंकेचेच काहीं अधिकारी सामील असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.