मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांच्या पक्षाच्या 12 राज्यांचे अर्थात या प्रदेश शाखांच्या प्रमुखांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अन्य काही राज्यांचा त्यात समावेश आहे. तुमच्या राज्यातील पक्षाच्या विस्तारासाठी तुम्हाला सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल असे आश्वासन या नेत्यांना देण्यात आल्याची माहिती समजते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. विविध राज्यांच्या शिवसेना क्षेत्रीय प्रमुखांची बुधवारी बैठक झाली. त्यात या सगळ्यांनीच आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दुुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, दिल्ली, मणिपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, राजस्थान, हैदराबाद, गोवा, कर्नाटक, प. बंगाल, ओडिशा आणि त्रिपुरा आदी 12 राज्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. या सगळ्यांनाच त्यांच्या राज्यात पक्षाचा विस्तार आणि विकास करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. या राज्यप्रमुखांची नावेही एका वाहिनीने दिली आहेत. मात्र उध्दव ठाकरे अथवा त्यांच्यावतीने अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.