बेंगळुरू – न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने गोलंदाजांच्या जोरावर महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारत अ संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 293 धावा केल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा पहिला डाव 237 धावांवर संपवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारत अ संघाने आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 40 धावा केल्या असून आता त्यांच्याकडे 96 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे.
Stumps Day 2: India A – 40/1 in 10.6 overs (R D Gaikwad 18 off 27, P K Panchal 17 off 30) #IndAvNzA #IndiaASeries
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 16, 2022
भारत अ संघाने केलेल्या 293 धावांसमोर न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. डेन क्लीव्हरच्या 34 धावा वगळता त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांनी साफ निराशा केली. 5 बाद 99 असा त्यांचा डाव अडचणीत सापडलेला असताना मार्क चॅपमन व सीन सोलिया यांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
चॅपमन आपले शतक साकार करण्यात अपयशी ठरला. तो 115 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला. पाठोपाठ सोलिया देखील अर्धशतकी खेळीनंतर 111 चेंडूत 7 चौकारांसह 54 धावा करत परतला. हे दोघे बाद झाल्यावर मात्र, भारताच्या गोलंदाजीसमोर त्यांचे तळातील फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारताकडून सौरभ कुमारने 4, राहुल चहरने 3 तर, मुकेश कुमारने 2 गडी बाद केले.
पहिल्या डावात 56 धावांची आघाडी मिळाल्यावर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 40 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा पहिल्या डावातील शतकवीर ऋतुराज गायकवाड 18 तर, कर्णधार प्रियांक पांचाळ 17 धावांवर खेळत आहेत.