लातूर – देशात मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊनची स्थिती आहे. दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लातूरमध्ये क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यातील हेर येथील एका युवकाने वांग्याच्या भाजीसाठी आपल्या पत्नीला रॉकेल ओतून पेटवून दिलं. या घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
आरोपी पतीचं नाव शादुल शेख असून पीडित पत्नीचं नाव फर्जाना शेख आहे. पत्नी फर्जाना हिने शनिवारी सकाळी घरी वांग्याची भाजी केली होती. मात्र पती-पत्नीमध्ये झाल्याने शादुल जेवण न करताच निघून गेला. रात्री शादुल दारू पिऊन घरी आला. त्याने बायकोला सकाळी केलेली वांग्याची भाजी मागितली. फर्जाना यांनी वांग्याची भाजी संपल्याचं पतीला सांगताच पती शादुल संतापला.
संतापलेल्या शादुलने रागाच्या भरात पत्नीवर रॉकेल टाकून पेटवून दिलं. यात फर्जाना गंभीररित्या भाजल्या आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे. पीडितेला लातूरमधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.