पुणे -लहान मुलेच नव्हे, तर मोठेही सापशिडी आणि विविध खेळ रस्त्यावर खेळताना रविवारी पहायला मिळाले. संगीतमेळ्यात उत्स्फूर्तपणे गाणी म्हणणे, झुम्बा डान्स, मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिकही भारावून टाकणारे होते. हे शहरातील कोणत्या मैदानावर नव्हे तर चक्क लक्ष्मी रस्ता आणि शहरातील अन्य रस्त्यांवर रविवारी अनुभवायला मिळाले. निमित्त होते, पुणे महापालिकेतर्फे आयोजित दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या पादचारी दिनाचे!
पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतर्फे गतवर्षी 11 डिसेंबरला “पादचारी दिन’ साजरा करण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदाही हा उपक्रम साजरा करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी संजय कोलते, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
गरूड गणपती चौक ते उंबऱ्या गणपती चौक हा भाग सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत वाहतूक तसेच पार्किंगसाठी बंद होता. या वॉकिंग प्लाझा मार्गावर रंगरंगोटी करण्यात आली होती. दिवसभर पथनाट्य, संगीत असे कार्यक्रम सादर करण्यात आले.
अनेक संस्था, संघटनाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. “सेफ किड्स फाउंडेशन’ने सापशिडीच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती केली. तसेच मुलांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली. परिसर संस्थेने सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून वायू प्रदूषणाबाबत जागृती केली. “रास्ता’ या बॅंडने सादर केलेल्या गाण्यांवर आबालवृद्धांनी ताल धरला. “शिवयोद्धा मर्दानी आखाडा पथका’ने शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. याशिवाय बॅडमिंटन, रिंग्ज, हूला हुप, रस्सीखेच, दोरीच्या उड्या अशा विविध खेळांनाही मोठा प्रतिसाद लाभला.