जामखेड: पवारांचा नाही तर आमचा रोहित विजयी व्हावा, ही कर्जत जामखेडच्या सामान्य जनतेची भावना.त्यांच्या विजयाच्या पैजा तर लागल्या पण अनेक नवसही बोलले गेले. रोहित विजयी होईपर्यंत घास घशाखाली ढकलणार नाही असे म्हणत विमल मंडलिक यांनी उपवास धरला होता. निवडणुकीत विजयी होताच रोहित यांनी या माऊलीच्या घरी जाऊन स्वतःच्या हाताने घास भरवत या माऊलीला उपवास सोडायला लावला.
या घटनेनं नेत्याचं कार्यकर्त्यांवर आणि कार्यक्रर्त्यांचं नेत्यावर प्रेम कसं असत याच एक मूर्तिमंत उदाहरण समोर आलं आहे. परंतु हल्लीच्या राजकारणात या गोष्टी दुर्मिळ होत आहेत. रोहित पवारांच्या विजयासाठी महिनाभर उपवास करणाऱ्या माऊलीच्या रोहित भेटीचा हा क्षण अतिशय भावनिक ठरला आहे.
गुरुवारी विजयानंतर रोहित पवार यांनी चौंडी येथे जाऊन राम शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रोहित पवार हळगाव येथे पोहोचले. कार्यकर्त्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केले. पवार यांनी मतदारांचे आभार मानले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जंगी स्वागत केले. हळगाव येथील दलित वस्तीलाही यावेळी पवार यांनी भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला.
पवार यांनी दलित वस्तीला भेट दिल्यानंतर तेथे महिलांनी औक्षण करत पवार यांचे स्वागत केले. माजी ग्रामपंचायत सदस्या विमल मंडलिक यांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी गेल्या महिनाभरापासून उपवास धरला होता त्यामुळे रोहित यांनी त्यांची भेट घेत स्वतःच्या हाताने घास भरवून मंडलिक यांचा उपवास सोडला आहे. त्यानंतर मंडलिक यांनी देखील रोहित पवारांना घास भरवला. यानंतर सर्वच उपस्थित भावुक झालेले पाहायला मिळाले.