कराड – कोपर्डे हवेली, ता. कराड येथील अभिजीत उर्फ पप्या होवाळ याने त्याचे वडील तानाजी लक्ष्मण होवाळ (वय 65) यांना मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात तानाजी होवाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजय शामराव सरगडे (वय 53, रा. कोपर्डे, ता. कराड) यांच्या फिर्यादीवरून कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अभिजितला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोपर्डे हवेली, ता. कराड येथे मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास अभिजित होवाळ हा त्याच्या घराबाहेर उभा राहून, कोणाशी तरी फोनवरून बोलत होता. मी पप्पाला मारले आहे. आता मी मुंबईला जाणार आहे, असे तो सांगत होता. त्याचे बोलणे संजय सरगडे यांनी ऐकले होते. त्यानंतर रात्री 1.30 च्या सुमारास संजय सरगडे यांना त्यांचा लहान भाऊ राजेंद्र सरगडे यांच्याकडून समजले की, पप्याने त्याच्या वडिलांनी दांडक्याने मारले असून, तो पळून गेला आहे.
त्यामुळे संजय सरगडे हे रात्री 1.45 वाजता होवाळ यांच्या घरात गेले. तेथे तानाजी होवाळ हे निपचित पडले असून, त्यांच्या अंगावर चादर टाकली होती. त्या चादरीवर रक्ताचे डाग होते. त्यांच्या शेजारी लाकडे दिसत होती. होवाळ यांच्या शेजारी पत्नी, मुलगी बसलेली सरगडे यांना दिसले. पप्या तेथे नसल्याने, त्यानेच खून केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. तेथे जमलेल्या नातेवाइकांनी पहाटे कोपर्डे हवेली येथील स्मशानभूमीत तानाजी होवाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास करून संशयित पप्या होवाळला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे तपास करत आहेत.
=================