नवी दिल्ली- कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिाकर्जुन खर्गे यांच्या कार्यालयात उद्या म्हणजे सोमवारी नव्याने स्थापन झालेल्या इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातील रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे.
सगळ्यांत प्रथम मणिपूर येथे दोन महिलांची निर्वस्त्र अवस्थेत जी धींड काढण्यात आली त्या निषेधार्थ संसद भवनातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर अगोदर निदर्शने केली जाणार आहेत. मणिपूर प्रश्नी विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधानांनी याबाबत बोलावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
आता हाच विषय सभागृहात लावून धरण्याची विरोधकांची योजना आहे. मणिपूरच्याच मुद्द्यावर सलग दोन दिवस लोकसभा आणि राज्यसभेचेह कामकाज स्थगित करावे लागले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या विषयावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचे म्हटले असून त्यानंतर गृहमंत्री उत्तर देतील असा प्रस्तावही ठेवला आहे.