मौज : नवलोत्सवाचा चैत्र

अरुणा सरनाईक

चैत्रागमन! चैत्राच्या स्वागताची तयारी खरं तर फाल्गुनापासून सुरू झालेली असते. मग चैत्राचे का बरे एवढे अप्रूप. तर कारण असे की, आतापर्यंत धारण केलेली संयमाची कसोटी झुगारून देण्याचे धारिष्ट्य चैत्र देतो. उन्मत्त प्रेमाची ऊर्मी सगळ्या सृष्टीतून स्रवत असते.

सुख काय आणि दु:ख काय! बरोबर येतात ती हातात हात घालून. ही सोबत येण्याची परंपरा आपण निसर्गातून शिकतो. वसंत येतो तोच मुळी आपल्या सहचरांसकट. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन मास जणू सुखाची पर्वणी. निरनिराळ्या भावभावनांची एकत्र चित्रावली. एकत्र आविष्करण, बेसुमार रंगांनी नटलेले, घटकेत थंड वारे, घटकेत उष्ण प्रखर वारे, भ्रम निर्माण करणारे मृगजळ, निर्मितीच्या वातावरणाला पोषक असे हे दिवस. एक दुसऱ्यात बेमालूमपणे मिसळणारे हे दिवस. तरी पण चैत्र खरा कुसुमाकर. ऋतुराज वसंताच्या हृदयाचे स्पंदन. मधुमासाचे उत्कट रूप. चैत्राचा काळ म्हणजे नवलोत्सवाचा, महापर्वाचा, निर्मितीचा क्षण. प्रत्येक वितरागी, अनुरागी, विरागी कवींना क्षणकाल का होईना मोहवश करणारा चैत्र.

सारी सृष्टी नव्याच्या स्वागतासाठी सज्ज होते. खरंतर या स्वागताची तयारी फाल्गुनापासून सुरू झालेली असते. मग चैत्राचे का बरे एवढे अप्रूप. तर कारण असे की, आतापर्यंत धारण केलेली संयमाची कसोटी झुगारून देण्याचे धारिष्ट्य चैत्र देतो. उन्मत्त प्रेमाची ऊर्मी सगळ्या सृष्टीतून स्रवत असते. फुलाफुलांतून सारा जिवंत निसर्ग तुम्हाला आवाहन देत असतो. मनातल्या प्रीतीला संयमानी बांधून ठेवण्याची गरज नसते. केवळ मनुष्याचेच नव्हे पक्षीदेखील स्वच्छंद गाणी गातात आणि मग सुरू होतो नवनिर्मितीच्या आनंदपर्वाचा क्षण.

सर्जनशीलता हीच खरी चैत्राची मानसिकता. या चैत्र वाऱ्याला एक गंध असतो. शरीराला आणि मनाला उत्तेजित करणाऱ्या मोगऱ्याचा स्पर्श असतो. उष्ण वाऱ्यात मोगऱ्याची मदिरता असते, तशीच कोवळ्या कातर कडुलिंबाच्या पानांची तरलता असते. दुपारच्या भगभगीत उन्हात पेटल्या पळसाच्या दर्शनाने तप्त झालेल्या नजरेला कोवळा गारवा देण्याचे आणि मनाला एवढेच नव्हे तर मेंदूला देखील शीतलता देण्याचे सामर्थ्य या कडुलिंबात आणि मोगऱ्याच्या सुवासात असते. या मोगऱ्याचा गंध, रेशमी वस्राची सळसळ आणि संध्याकाळच्या आकाशात विखुरलेले रंग. या संध्येच्या वर्णनासाठी फक्‍त कवी ग्रेसच हवे.

अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे हृदयस्पंदनाचा झरा?

शब्दप्रभूंनी कोणता शब्द कोणाच्या मागे लावावा आणि रसिकांसमोर ठेवावा, त्याचबरोबर आता हवा तो अर्थ तुम्हीच शोधा, असा खडा सवाल टाकावा, तसा “घनवसंत मोगरा’. अर्थांचे पाट वाहतील तरी मनाजोगा अर्थ मिळणे कठीणच!

वसंत सृष्टीचा हृदयसखा, असे चैत्राचे वर्णन प्राचिनांनी आणि अर्वाचिनांनी केलेले आहे, ते खरंच योग्य होय. एखाद्याच्या मनाचा थांग लागत नाही. कितीही प्रकाराने विचार करावा तरीसुद्धा तो उमगत नाही. प्रत्येक वेळी नवा वाटतो, अगम्य वाटतो, असे आपण बरेचदा म्हणतो. तसाच हा चैत्र आहे. कितीही डोळ्यांनी निरखावा, भावनेने पारखावा, शब्दांनी सजवावा, तरीही अपुराच आहे, नादयुक्‍त आहे, गंधयुक्‍त आहे. लोकगीतातून, संस्कृत काव्यातून वर्षानुवर्षे चैत्र वाचत आलो, अभ्यासत आलो, तरीपण तो कळत नाही. देशोदेशी वेगवेगळा फुलतो, तरी एकाच निर्मितीच्या भावनेस धरून असतो. निसर्गाचे सारे रंग चित्रकारांनी, आपल्या चित्रात बंद केले. निसर्गाचे सारे भावमृदूपण काव्यात चित्रित झाले. निसर्गाच्या प्रेमाचे रूप मानवी भाव लेवून कथांमधून जिवंत झालेत.

तरीपण अंतिम आणि आदिम सत्य त्यांनी आपल्या जवळच ठेवले. कसा बदलतो तू? कसे बदलते हवामान? कोणत्याही वेळापत्रकात न बसता कसे चालते ऋतुचक्र? कसे कळते मोगऱ्याला चैत्र आला म्हणून? कसे कळते वाऱ्याला गंध वाहता ठेवावा म्हणून? कसे कळते पिंपळाच्या लालवट, गुलाबीसर पानांना चंद्रप्रकाशात सळसळावे म्हणून? कसे कळते प्रचंड शिरिषांच्या भिरभिरत्या फुलांना हवेसोबत डोलावे म्हणून? मग एकच या विचाराने, ज्यांची उत्तरे कधीच मिळत नाहीत अशा प्रश्‍नांनी स्वत:ला का विव्हळ करावे! जे जसे आहे तसेच स्वीकारावे. आपण फक्‍त बदलत्या ऋतूंचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा.

प्रत्येक रहस्याचा भेद करण्याचा प्रयत्न न करावा. प्रत्येकाचे प्रत्येकाशी काय नातं आहे, याचा शोध न घ्यावा. कारण ही नाती सांगताच येत नाहीत. ती फक्‍त जाणवतात. जाणवावे पण नक्‍की काहीच करता येऊ नये, अशी आतल्या जीवाची काही नाती असतातच ना! रेशमी कपड्याला आतून अस्तर लावल्यासारखी ऊब देणारी, उघड पाहू न देणारी, आतल्याआत आपसातच जीवनरस पुरवणारी ही नाती नेमके नाते न सांगणारी असतात, तसेच हे ऋतूंचे वागणे, स्पष्टीकरण न देता फक्‍त आनंद देणारे! हातचे राखूनही आपल्यात सामावून घेणारे. एखाद्या अवचित क्षणी स्वत: अलवार होणारे आणि आपल्यालाही अलवार करणारे. अभिजात आणि सनातन नाते. त्याचे पुरावे असले नसले तरीही असणारे!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.