मुंबई – काल संपूर्ण भारताने मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी झेंडा वंदन करून अनेकांनी देशाप्रती आपला अभिमान व्यक्त केला. सोशल मीडियावर देखील देशभक्तीपर संदेश व्हायरल होताना दिसून आले. अनेक व्हीआयपी लोकांसह सेलिब्रेटींनी देखील सर्व नागरिकांना सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं नवीन देशभक्तीपर गाणं प्रदर्शित केलं आहे. सध्या त्यांच्या या गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यांना नेहमी प्रमाणे ट्रोल देखील केल्याचं दिसून आलं आहे.
गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी नेहमीच शेअर करत असतात. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.! ‘सारे जहाँ से अच्छा’ देशभक्तीपर गीत गाण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या गाण्याला श्री सत्य कश्यप यांनी संगीत दिलं आहे.’ असं देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला आतापर्यंत 12 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाईक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचं हे गाणं प्रचंड व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.