मुंबई – बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा दुचाकीवरून प्रवास केलेला फोटो चर्चेत आला आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अमिताभ बच्चन यांनी शूटिंगकरिता वेळेत पोहचण्यासाठी एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली. त्या व्यक्तीच्या बाइकवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, यावरून आता अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी अमिताभ बच्चन यांची पोस्ट मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला टॅग करत तक्रार केली आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट घातला नाही. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वाराने देखील हेल्मेट घातलेला नाही. यावरून आता नेटकरी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
‘वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखे आहेत, अमिताभ बच्चन यांच्यासाठी वेगळा नियम नाही’, असे म्हणत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावर मुंबई पोलिसांनी देखील आम्ही ही बाब वाहतूक शाखेसोबत शेअर केल्याचे उत्तर दिले आहे. यातून अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई केले जाण्याचे संकेत दिले जात आहे.
काय होती अमिताभ बच्चन यांची पोस्ट?
आमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते एका व्यक्तीच्या बाइकच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या दुचाकीस्वाराचे आभार व्यक्त करत लिहिले होते की, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळख नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’