वॉशिंग्टन: अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अमेरिकेच्या 244 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत.
दिनांक 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेने ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्याचे जाहीर केले होते. यालाच अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ओळखले जाते. त्या जाहीरनाम्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 4 जुलै रोजी अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या निमित्त सर्व देशभर सुट्टी असते.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी अध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेच्या नागरिकांना देशाच्या 244 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असलेल्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याबद्दल आम्ही आनंद साजर करतो आहोत, असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले अहे.
मोदींनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना ट्रम्प यांनी मोदींचे अभार मानले आहेत आणि अमेरिकेचे भारतावर प्रेम असल्याचेही म्हटले आहे.
मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ट्विटरवरील संवाद वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. दोन्ही देशातील अनेक व्यक्तींनी हा संवाद रीट्विट केला आहे.