नवी दिल्ली- झारखंड राज्याने काही कंपन्यांना ग्राहकांना थेट घरी मद्य पुरविण्याची परवानगी दिली होती. आता ऍमेझॉन या इ-कॉमर्स कंपनीला आणि बिग बास्केट या कंपनीला पश्चिम बंगाल सरकारने इ-कॉमर्सच्या माध्यमातून मद्य पुरवठा करण्याची परवानगी दिली आहे.
भारतातील मद्य बाजारपेठ तब्बल 27 अब्ज डॉलरची आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करू शकतात. स्विगी व झोमॅटो या अन्नपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना काही शहरांमध्ये मद्य पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र राष्ट्रीय पातळीवर या संदर्भातील निर्णय झालेला नाही. कारण या बाबी संबंधित राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतात. अशा निर्णयानंतर काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास करून इतर राज्य या संदर्भात आगामी काळात निर्णय घेण्याची शक्यता आहे.