पंजशीर, दि. 10 – अफगाणिस्तानमधील पंजशीर व्हॅलीत तालिबानी आणि एनआरएफ यांच्यात संघर्ष वाढला आहे. या लढाईत अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह हा ठार झाल्याचे वृत्त आहे.
काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधल्या एका लायब्ररीत बसून एक व्हिडिओ जारी केला होता. आता तीच लायब्ररी पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण तालिबानचा एक दहशतवादी त्याच खुर्चीवर बसलेला एक फोटो तालिबानकडून जारी करण्यात आला आहे.
याचाच अर्थ असा की, ज्या ठिकाणी बसून अमरुल्ला सालेह तालिबानला ललकारत होते, त्याच ठिकाणी आता तालिबान पोहोचल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, अहमद मसूदचे समर्थन करणारे मार्श दोस्तम यांनी ताजिकिस्तान, उझबेकिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले. एनआरएफ आणि तालिबानमध्ये पंजशीरला घनघोर युद्ध सुरू आहे. त्याचा निकाल काहीही लागू शकतो. त्यामुळे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची घाई करू नका, असे मार्शल दोस्तम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजशीर व्हॅलीत तालिबानने कब्जा केला असून, मोठ्या प्रमाणात लोकांवर अत्याचार केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. यात नेमके किती लोकांना ठार मारण्यात आले, याचा निश्चित असा आकडा समोर आलेला नाही. पण पंजशीरमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून, दोन्ही बाजूचा मृत्यूचा आकडा मोठा असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.
चौकट
अहमद मसूदचे गोदाम ताब्यात
अहमद मसूदच्याच नेतृत्वात एनआरएफ लढत आहे. पंजशीरचे शेर म्हणून अहमद मसूदला ओळखले जाते. 1996ला ज्यावेळेस तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्यावेळेसही त्यांना पंजशीर जिंकता आले नव्हते. यावेळेस मात्र पंजशीरच्या अनेक भागात तालिबानी घुसले आहेत. अहमद मसूदचे हत्यारांचे जे गोदाम आहे तेच तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पंजशीरमधून पाकिस्ताननेही दूर राहावे, अशी भूमिका इराणने घेतलेली आहे. त्यामुळेच तालिबान, पाकिस्तान आणि इराण अशा तिघांमध्ये पंजशीरवर वाद होताना दिसत आहे.