पुणे :- नवरात्र उत्सव येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर दिवाळी असते. या काळात नागरिक खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर 17 ऑक्टोंबरपासून रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू
ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या अधिक मास सुरु असून महाराष्ट्रात या महिन्याला मोठे महत्व आहे. या महिन्यात महिला आपल्या सौभाग्यासाठी पैंजण आणि जोडवी अधिक भर घालून ती नवीन खरेदी करतात. तसेच, जावयास अधिक मासाचे वाण देण्यासाठी चांदीचे पुजेचे साहित्य अथवा भांडी खरेदी करतात. नवरात्री आणि दिवाळी उत्सवात सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु राहतात. त्यामुळे शासनालाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. दिवाळीनंतर लगेचच लग्नसराई सुरु होत असून, लग्नासाठी मोठी खरेदी केली जाते.
सध्या दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सात वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे ती वाढवून देण्याची गरज आहे. पुणे शहरातील नोकरदार वर्ग कामावरुन आल्यानंतर खरेदीसाठी निघतो. त्यांना खरेदीसाठी फक्त एक तास मिळतो त्या तासात पूर्ण खरेदी होत नाही. शासनाने हॉटेल्स आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर दुकाने नऊपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केली आहे.