नाशिक – नाशिकमध्ये निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर उपचार करणारे बहुतांश आरोग्य कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राला दोन दिवस टाळे ठोकण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बहुतांश जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याने हॉस्पिटमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यात करोनाची तिसरी लाटही आगामी काळात खूप काही तीव्र येईल, ही शक्यता मावळली आहे.
नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या सध्याही जास्तच आहे. सध्या महापालिका क्षेत्रासह नाशिक, निफाड, सिन्नर आणि दिंडोरीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 25 हजार 918 करोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत 16 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 80 % आरोग्य कर्मचारी करोना बाधित झाल्याचे समोर आले. त्यामुळे हे केंद्र दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.