सर्वपक्षयीय उमेदवार “शांती’च्या “वाड्या’वर

खेड-आळंदी मदतदारसंघात सोशल मीडियावर जोरदार चर्चा : यंदा तिरंगी लढत होण्यावर जवळपास शिक्‍कामोर्तब

रामचंद्र सोनवणे

राजगुरुनगर, दि. 10 – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्यातरी शांत आहे. यामुळे उमेदवार “शांती’च्या वाड्यावर गेल्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. तर यंदा या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. अनंत चतुर्दशी किंवा त्यांच्या दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागण्याचे चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आचारसंहिता केव्हा लागेल, याकडे लागले आहे. त्यामुळे अनेकजण छुप्या युक्‍त्या वापरत आपली उमेदवारी आजमावत आहेत. सध्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे तालुक्‍यात जड असून भाजप व सेना कसा लढा देणार? याकडे सर्वसांचे लक्ष आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असताना त्यांना अपयश आले होते तर शिवसेनेची लॉटरी लागली होती. मात्र, ही परिस्थिती त्यावेळच्या निवडणुकीत होती ती यावेळी राहील यात मोठी शंका आहे. कारण अनेक जणांची आश्‍वासने पूर्ण न झाल्याने मदत करणारे बाजूला झाले आहेत. त्यामुळे शिवेसनेपुढे या निवडणुकीत कडवे आव्हान असणार आहे. तालुक्‍यात भाजपने अगोदरच मुसंडी मारली आहे, त्यामुळे भाजपला युती जागा सोडणार का? तर दुसरीकडे आघाडीकडे कॉंग्रेसमधील नेते खेडची जागा मागत असल्याने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागा वाटपात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असले तरी ही जागा स्थानिक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागितली आहे. त्यातच या मतदारसंघात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याने ही जागा राष्ट्रवादीलाच सुटेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते हेच उमेदवार असतील. तरी पक्षाचे नेते शरद पवार यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे सुतोवात केल्याने पक्षातील अनेक नवखे चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये बाबा राक्षे, रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. ही जागा कॉंग्रेसला सुटली तर अमोल पवार हे कॉंग्रेसचे उमेदवार असणार आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तालुक्‍यातील परिस्थितीचा आढावा दिला आहे. तसेच अमोल पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याचीदेखील शक्‍यता वर्तवण्यात येत असल्याने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये रस्सीखेच असल्याने पक्षश्रेष्ठींपुढे डोकेदुखी ठरली आहे.

शिवसेना-भाजप युती झाली तर विद्यमान आमदार सुरेश गोरे हे उमेदवार असतील. आघाडी झाली तर दिलीप मोहिते उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीतील उमेदवार उभा असून त्यात अतुल देशमुख, अमोल पवार यांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुक उमेदवार सर्वजण एकत्र आल्यास तालुक्‍यात मोठी आघाडी तयार होणार आहे. जर युती-आघाडी झाली तर तिसरा पर्याय तयार होणार असल्याने आणि निवडणुकीत मतदारांपुढे तिसरा उमेदवार पक्षातील नाराज उमेदवार असणार आहे.

  • तिसऱ्या आघाडीची अद्याप बैठक नाही
    तिसऱ्या आघाडीची एकत्रीकरणाची बैठक अद्याप झाली नसल्याने नक्‍की कोण उमेदवार ठरावाला आहे, याकडे लक्ष लागून आहे. ज्याला अपक्ष निवडणूक लढवायची आहे त्याने त्याचे पत्ते अजून खुले केले नसल्याने त्यांच्यातही संभ्रम आहे. यावेळी गोरे व मोहिते यांच्या विरोधात आघाडी उभी राहणार का? या आघाडीतील नेत्यांना गोरे-मोहिते आपलेसे करणार हे अजूनही निश्‍चित झाले नाही तथापी इच्छुक सर्वच आम्हालाच पक्षाचे तिकीट मिळणार या आशेवर असून निवडणुकीच्या तयारीत आहेत.
  • यंदाही परिवर्तनाचे वादळ!
    युतीची जागा भाजपला मिळवण्याची जोरदार तयारी पक्ष श्रेष्टींकडे सुरू आहे. तशीच परिस्थिती आघाडीतील कॉंग्रेसची आहे. त्यामुळे जर शिवसेना राष्ष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी बदलली तर राजकीय गणिते बदलणार आहेत. यामुळे तालुक्‍यात पुन्हा परिवर्तन होणार असल्याचे चित्र निवडणुकी आधीच दिसून येत आहे.
  • तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
    खेड-आळंदी मतदारसंघातील राजकीय गणिते ही तिसऱ्या आघाडीवर अवलंबून आहेत. ही तिसरी आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसमधील नाराज नेत्यांची आहे. ते ज्याच्या मागे उभे राहतील तो उमेदवार निवडून येणार यात शंका नाही. मागील निवडणुकीत असेच झाले होते. त्यामुळे यंदा ही ताकद कोणा मागे उभी राहते हे लवकरच स्पष्ट होईल; मात्र तोपर्यंत “वेट अँड वॉच’ची भूमिका पार पाडावी लागेल.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×