All England Open Badminton Championships 2024 : – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे.
तिची स्पर्धा जर्मनीच्या यव्होन लीशी होती. मात्र, यव्होनला सामन्यादरम्यान दुखापत झाली आणि तिने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अन् या सामन्यातून निवृत्ती घेतल्याचा फायदा सिंधूला झाला. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. त्यामुळे आता ती थेट दुसऱ्या फेरीचा सामना खेळणार आहे.
ऑलिम्पिक तसेच जागतिक स्पर्धांच्या बरोबरीने ऑल इंग्लंड स्पर्धेला प्रतिष्ठा असते. या स्पर्धेचा सिंधूचा सलामीचा सामना जर्मनीच्या यव्होन ली विरूध्द होता. यव्होन ली हिने पहिल्या गेमनंतर सामन्यातून माघार घेतली. पहिली गेम सिंधूने 21-10 अशी सहज जिंकली होती. आता दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना कोरियाच्या एन सी योंग हिच्याशी होणार आहे.
याच खेळाडूशी सिंधूचा सामना आशियाई विजेतेपद स्पर्धेतही झाला होता. त्यात सिंधूने बाजी मारली होती. आता पुन्हा या दोघी एकमेकींसमोर येत आहेत. या स्पर्धेचेच विजेतेपद अद्याप भारताच्या दोन खेळाडूंनी मिळवले आहे. प्रकाश पदुकोन यांनी 1980 साली तर पी. गोपीचंद यांनी 2001 साली मिळवले होते. त्यानंतर गेल्या 23 वर्षात भारताच्या एकाही खेळाडूला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 विश्वचषक 2024 च्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक कारण आलं समोर…
सिंधूचीच सहकारी खेळाडू सायना नेहवालचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न आता अपूर्णच राहिले असून सिंधूकडून यंदा विजेतेपदाची तसेच अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याची अपेक्षा केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच फ्रेंच ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद मिळवलेल्या सात्किव साइराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्याकडून दुहेरीत हे यश मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.