Alandi Kartiki Yatra 2021: आळंदी यात्रा आठ दिवसांवर, पूर्वतयारीला वेग

आळंदी – (एम.डी. पाखरे, ज्ञानेश्वर फड) – दोन वर्षांच्या खंडानंतर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित होणार आहे. करोनासाथीमुळे भाविकांना आळंदी यात्रेला येता आले नाही. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यात्रा मोठ्या उत्साहात होणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे 725वे वर्ष आहे. त्यामुळे यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येणार हे गृहीत धरून यात्रेच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. दर्शनबारी मंडप उभारणी सुरु आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन वर्ष यात्रा न भरल्याने हताश असलेल्या व्यावसायिक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. मूर्ती, तुळसीमाळा, ग्रंथ, इद्यादी साहित्यांनी दुकानं गजबजली आहेत. माऊली मंदिर संस्थानच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु असून करोना नियमांचे पालन करून यात्रेला परवानगी मिळाली आहे.

– दर्शनबारी मंडप बांधणीला वेग

30 तारखेला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी आळंदीत सर्वाधिक भाविक असतात. लाखो भाविक येणार असल्याचे गृहित धरून इंद्रायणी पलिकडील भागात दर्शनबारी मंडपाचे काम वेगात सुरु आहे. तसेच पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.

– मूर्ती, तुळसीमाळाची दुकानं सजली

दोन वर्ष यात्रा न झाल्याने येथील भाविक ग्राहकांवर आधारित असलेले व्यावसायिक हताश होते. मात्र, यंदा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थित होणार असल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यात्रेनिमित्त मंदिरात 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान कार्यक्रम

“कार्तिकी यात्रेनिमित्त माऊली मंदिरात 25 नोव्हेबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर प्रत्यक्ष सोहळ्यास 27 तारखेला हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरुवात होणार आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतरावबाबा वंशज प्रतिनिधी यांच्या तर्फे हैबतबाबा यांच्या पायरीची पूजा होईल. नंतर वेळेनुसार, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, कीर्तन, जागर इत्यादी कार्यक्रम होतील. 30 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी दिवशी दुपारी श्रींची नगरप्रदक्षिणा होईल. 2 डिसेंबरला माऊलींच्या सोहळ्या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. 12 ते 12.30 यावेळेत माऊलींच्या 725व्या संजीवन समाधी दिनानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती व मान्यवरांना नारळप्रसाद वाटप होईल. 4 डिसेंबरला रात्री 9.30 ते 12.30 या वेळेत श्रींचा छबीना होईल आणि सोहळ्याची सांगता होईल” – ज्ञानेश्वर वीर (व्यवस्थापक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.