पुणे – जुन्नर येथील गॅस वितरकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरोली बुद्रुक येथील शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे याला जुन्नर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसेची तक्रार दिली होती. आता अक्षय बोऱ्हाडेचा पाय आणखी खोलात गेला असून त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.
अक्षय बोऱ्हाडे याच्याविरुद्ध आज आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.एका तरुणीने अक्षय विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी तिने जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याआधी अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पतीवर कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप केले होते. तसेच अक्षयने इतर मुलींची फसवणूक केल्याचे आरोपही केली होती. आता अक्षयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अक्षय लोकांना फसवतोय. तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता सत्य तपासावं, अशी मागणी रुपाली बोऱ्हाडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी केली होती.