अकोला – अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात रविवारी सायंकाळी झाड कोसळून 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता, त्याच वेळी मंदिरात 50 ते 60 भाविक होते. या घटनेची एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांमध्ये 5 पुरुषांसह 2 महिलांचा समावेश आहे.
पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2023
नेमकं काय घडलं ?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी होती. रविवारी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास मंदिरात आरती झाली. आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या शेडचा आधार घेतला आणि नेमकं याच वेळी घात झाला. वाऱ्यामुळे मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड शेडवर कोसळले.
ज्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला, त्यावेळी काही लोकं मंदिराच्या आतमध्ये गेले, तर 15 ते 20 जण मंदिराच्या शेडमध्ये होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लिंबाचे झाड शेडवर कोसळले. शेडखाली उभी असलेली लोक शेडखाली अडकले. आतापर्यंत 7 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचं पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यासोबतच ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, जोरदार वारा आणि पाऊस बचाव कार्यात अडथळा ठरत होता.