मुंबई – अजित पवार राष्ट्रवादीतील आमदारांसह सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गट बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. अशात अजित पवारांसह सर्व आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी सर्व अजित पवारांसोबतचे सर्व आमदार उपस्थित होते. या सर्व घडामोडीवर आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले. अशात शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो. पण मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसजी आणि अजितदादा हे तिघे सध्या एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार वेगाने काम करेन यात शंका नाही असं सामंत यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना सामंत म्हणाले,”अजित पवारांनी शरद पवारसाहेबांची भेट का घेतली हे त्यांनाच विचारावं लागेल. त्यांनाच ते येत्या काळात जाहीर करावं लागेल. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो”. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली विकास कामे अजित पवार यांना चांगली वाटत आहेत त्यामुळे ते मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्रजी यांच्या गतिमान सरकारसोबत आले आहेत असं स्पष्ट मत यावेळी सामंत यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीसांनी देखील दिली प्रतिक्रिया
मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.