म्हणाले की मी राष्ट्रवादीतच, पवारसाहेबच आमचे नेते
मुंबई- उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अज्ञातवासात गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार हे आज ट्विटरवर प्रकटले. त्यांनी एका ट्विटर संदेशातून सध्याच्या राजकीय पेच प्रसंगात आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच असून शरद पवार हेच आमचे नेते आहेत, आणि आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप मिळून पाच वर्ष राज्याला स्थीर सरकार देऊ.
त्यांच्या ट्विटर संदेशातून लोकांना बुचकळ्यात पाडणारा संदेश दिला गेला असला तरी खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांचे हे विधान फेटाळून लावले आहे. अजित पवार हे खोटा दावा करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पेच प्रसंगाची रंगत आणखीनच वाढली आहे.
अजित पवार हे मुंबईतच श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी राहायला आहेत असे समजले असले तरी ते अजून तेथून लोकांपुढे आलेले नाहींत. मी माझी भूमिका माझ्या सोयीनुसार लोकांपुढे मांडेन असा निरोप त्यांनी काल तेथून बाहेर धाडला होता.
त्यांच्या समवेत शपथविधीच्यावेळी राजभवनावर गेलेले बरेचसे आमदार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.
त्यामुळे त्यांच्या मनात बंडाची भूमिका अजूनही कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच आहोत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत असा जो संदेश जारी केला त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, तसेच अन्य भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करणारे ट्विटर संदेशही जारी केले आहेत. त्यांनी दुसरा एक राजकीय ट्विटर संदेश जारी केला आहे त्यात कोणत्याहीं पक्षाचे नाव न घेता म्हटले आहे की कोणीही कसलीही काळजी करण्याचे कारण नाही, सगळे व्यवस्थीत होईल. फक्त केवळ थोडासा धीर धरा. पाठींब्याबद्दल सर्वांच आभार.