मुंबई – बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण ‘भोला’ चित्रपटामुळे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काल 30 मार्च 2023 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘भोला’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल, असा अंदाज आहे. याआधी अजयच्या ‘दृष्यम-2’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. ‘दृष्यम-2’ ने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे ‘भोला’ ‘दृष्यम-2’चा रेकॉर्ड तोडू शकला नाही.
अजय देवगणचा भोला चित्रपटात वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट अजयचा आतापर्यंतचा सर्वात साहसी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. ही एका माणसाच्या सैन्याची कहाणी आहे, जी वेगवेगळ्या वेषात मानव आणि इतर शत्रूंच्या सैन्याशी लढते.
‘भोला’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत अभिनेत्री तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.