समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा -तालुक्यातील वांगदरी येथील स्ववर्धिनी महिला गटाच्या दिवाळी फराळाची “चव’ थेट अमेरिकेत पोहचली असून तिथे या दिवाळी फराळाची जोरदार विक्री झाली आहे. येथील पंचायत समिती कार्यालयातही फराळाचे “स्टॉल’ लावण्यात आल्याने या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
उमेद अभियानांतर्गत येथील पंचायत समिती कार्यालयात महिला गटांचे “स्टॉल’ लावण्यात आले होते. यामध्ये वांगदरी येथील स्ववर्धिनी महिला गटाचे दिवाळी फराळ व मढेवडगाव येथील रणरागिणी महिला गटाचे खेळणी व महालक्ष्मीचे “स्टॉल’ होते. याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वांगदरी येथील स्ववर्धिनी महिला गटाच्या महिलांनी दिवाळी फराळ निर्मिती केली. या महिलांनी बनविलेले फराळ अमेरिकेत “एक्स्पोर्ट’ करण्यात आले. अमेरिकेत असलेल्या भारतीय नातेवाईकांच्या माध्यमातून तेथील ग्राहकांपर्यंत हे दिवाळी फराळ पोहचले. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून व्यवसायात प्रगती करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.