कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आमदार रोहित पवारांना रोज नवनवीन राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. अश्यातच आता सिद्धटेकमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर ( ९ विरुद्ध १ ) झाला आहे. यामुळे सिद्धटेक ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली आहे. सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जत तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे.
कर्जत तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या सिद्धटेक ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता होती. येथील सरपंचपद रिक्त असल्याने राष्ट्रवादी समर्थक अमोल भोसले हे उपसरपंच म्हणून गावचा कारभार पाहत होते. उपसरपंच भोसले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी बंड पुकारत अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावासाठी गावातील पारंपारिक विरोधक (भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य) पहिल्यांदाच एकत्र आले. या सर्वांनी एकत्रित येत उपसरपंच अमोल भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने जिंकत राष्ट्रवादीच्या सत्तेला मोठा सुरूंग लावला.
सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी आज आमदार प्रा.राम शिंदे यांची भेट घेत विकासाभिमुख नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रमेश पवार, लता सांगळे, वामनराव मोरे, सखाराम तांदळे, शोभाबाई जाधव, रेश्मा खोमणे, उज्वला बनकर, अभिजीत मांढरे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच सारंग रोहिदास नलगे, चिंतामण सांगळे, सचिन बनकर, बंडा (भाऊ) मोरे, तुकाराम लष्कर उपस्थित होते. या सर्वांचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायतमध्ये विकासाचे राजकारण करा. सिद्धटेकचे सर्व विकास कामे मार्गी लावू , असा शब्द यावेळी त्यांनी दिला.