नगर -पुणे फुलगाव येथे दि. 4 ते 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी नगर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात गादी गटातून श्रीगोंदा येथील तुषार सोनवणे व नगर शहर केडगाव येथील सुदर्शन कोतकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली असून पै. सुदर्शन कोतकर यांनी विजय संपादित केल्याने त्यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच माती गटामध्ये युवराज चव्हाण व मनोहर कर्डिले यांच्यामध्ये देखील चुरशीची लढत झाली. यात युवराज चव्हाण यांनी विजय संपादित करीत महाराष्ट्र केसरी साठी मजल मारली.
गंगा उद्यान मागील जागेत महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने नगर जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस समवेत माजी आमदार अरुण जगताप, संघाचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप, हिंदकेसरी योगेश दोडके, मुंबई केसरी आबासाहेब काळे, महाराष्ट्र केसरी सइद चाऊस, गुलाब बर्डे, अशोक शिर्के, जि.प. सदस्य सचिन जगताप, संघाचे सचिव डॉ. संतोष भुजबळ, पै. शिवाजी चव्हाण. उद्योजक राजेंद्र चोपडा, युवराज करंजुले, रवींद्र कवडे, देवा शेळके, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, अनिल गुंजाळ, बबनराव काशीद, प्रा. माणिकराव विधाते,
प्रवीण घुले, मोहन गुंजाळ, आदी उपस्थित होते आ. जगताप म्हणाले, कुस्ती क्षेत्र हे फार कष्टाचे काम आहे. जो कष्ट करतो त्याला संधी मिळत असते. सर्वसामान्य घरातील पैलवानांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी नगर शहरांमध्ये कुस्ती संकुल उभे करायचे आहे. दर महिन्याला कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे. यासाठी तालुकास्तरावर स्पर्धेचे आयोजन करून त्या माध्यमातून प्रत्येक भागातील खेळाडू पुढे आणण्याचे काम केले जाणार आहे.
कुस्ती निवड चाचणीत माती विभागात 57 कि, वजन गटात संकेत सतरकर, 61 कि,वजन गटात विश्वजित सुरवसे, 65 कि, वजन गटात निलेश मोहिते, 70 कि,वजन गटात लक्ष्मण धनगर, 74 कि, वजन गटात सौरभ मराठे, 79 कि वजन गटात ऋषिकेश शेळके, 86 कि, वजन गटात हर्षवर्धन पठारे, 92 कि वजन गटात अनिल लोणारे, 97 कि वजन गटात अनिल ब्राम्हणे आणि महाराष्ट्र केसरी खुल्या गटात युवराज चव्हाण आदी मल्लांनी विजय मिळवला असून त्यांची पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली
गादी विभागात 57 कि, वजन गटात दीपक पवार, 61 कि, वजन गटात ऋषिकेश उचाळे, 65 कि, वजन गटात साहिल सय्यद, 70 कि,वजन गटात मयूर तांबे, 74 कि, वजन गटात ऋषिकेश काळे, 79 कि वजन गटात धुळाजी इरकर, 86 कि, वजन गटात अक्षय घोडके, 92 कि, वजन गटात आकाश भिंगारे, 97 कि, वजन गटात चेतन रेपाळे आणि महाराष्ट्र केसरी खुल्या गटात सुदर्शन कोतकर आदी मल्लांनी विजय मिळवला. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली.
100 पैलवानांना दत्तक घेणार : खा. रामदास तडस
नगर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा पारपडली. कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. जेव्हा जेव्हा कुस्ती क्षेत्रात आक्रमणे झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील पैलवानांनी देशाला कुस्तीची ओळख निर्माण करून दिली आहे. राज्याने पहिला हिंदकेसरी दिला. हरियाणा या राज्यापेक्षा महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रेसर होता. मात्र कालांतराने हरियाणा पुढे गेले. यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या माध्यमातून पहिलवान घडवण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतली आहे. त्याप्रमाणेच आ. जगताप यांनी जिल्ह्यातील पैलवानांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून 100 पैलवानांना दत्तक घेण्यात येणार आहे, असे खा. रामदास तडस यांनी म्हटले.