नवी दिल्ली – संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना ताजी असतानाच असा प्रकार पुन्हा समोर आला आहे. ती म्हणजे एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
गृहमंत्रालयाची सुरक्षा भंग करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला. दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्रासह त्यास अटक केली. आदित्य प्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. आदित्य सिंग कोणत्या उद्देशाने गृह मंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता, याचा तपास सध्या दिल्ली पोलीस करीत आहेत.
दरम्यान घुसखोरी करणारा तरुण हा कुणाची तरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालयाच्या कार्यालयात शिरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या घुसखोरीमागील मुख्य उद्देश समोर आला नाही.लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आले असून, संवेदनशील भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे.