मांजरी -पतीच्या निधनानंतर पत्नीचे सौंदर्यालंकार उतरवून तिचे सार्वजनिक जीवनातील सामाजिक स्थान कमी केले जाते. या कुप्रथेला मूठमाती, उच्चाटन करण्याचा निर्णय शेवाळेवाडीमधील गावकऱ्यांनी घेतला आहे. नुकताच तसा ठराव संमत करण्यात आला आहे. परिसरातील महिलांसह सुधारणावाद्यांकडून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
एकीकडे वेगवेगळ्या स्तरांवर महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असताना कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे, सार्वजनिक कार्यक्रमातील तीचा सहभाग बंद करणे अशा पारंपरिक कुप्रथांच्या जोखडात मात्र तीला अद्यापही अडकून पडावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत सदर निर्णय घेतला. राज्यातील काही ग्रामपंचायतींनीही अशी प्रथा बंद करण्याचे ठराव यापूर्वी केलेले आहेत.
महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या आणि अगदी शहरालगतच्या शेवाळेवाडी येथील ग्रामसभेत माजी सरपंच अशोक शेवाळे यांनी गावातील या कुप्रथा बंद करण्याबाबत ठराव मांडला होता. भारती शेवाळे यांनी या ठरावाला दिलेल्या अनुमोदनासह नागरिकांनी एकमुखाने तो संमत केला. यावेळी संजय शेवाळे, पंढरीनाथ शेवाळे, अशोक मोरे, युवराज शेवाळे, सचिन शेवाळे, शंकर कुंभारकर, नितीन शेवाळे, अक्षय शेवाळे, संदीप शेवाळे, अश्विनी चोरघडे, सुवर्णा कोद्रे, अर्चना पवार आदींसह शेवाळेवाडी गावातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.