मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणारा ब्रिटन आणि जर्मनी दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
दौरा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नमूद करण्यात आलेले नाही. तथापि राज्यातील सध्याच्या एकूणच दोलायमान स्थितीत हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे हे गुंतवणूक परिषदा आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्या दौऱ्यावर जाणार होते. तसेच, त्यांच्या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे महाराष्ट्रात परत आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार होती.
या घडामोडीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे की आपले बेकायदेशीर मुख्यमंत्री एक आठवड्याच्या विदेश दौऱ्यावर जाणार होते.
तथापि राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या दौऱ्यांना माझा विरोध नाही पण हे दौरे दावोस सारख्या सहलींसारखे ठरताकामा नयेत.
दावोस येथील त्यांच्या 48 तासांच्या दौऱ्यासाठी राज्य सरकारचे जवळपास 40 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. त्या दौऱ्याचा कोणताही वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते त्या दौऱ्याची फलनिष्पत्ती काय हेही जाहीर केलेले नाही.
आणि त्या दौऱ्याच्या खर्चाचा आकडा अजुनही सरकार लपवत आहे असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. आता, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या 10 दिवसांच्या सहलीचे वेळापत्रक त्यांनी उड्डाण करण्यापूर्वी जाहीर केले पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.