“बिहारनंतर आता आम्ही पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवणार “

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची घोषणा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे अत्यंत रोचक पद्धतीने समोर आले. सुरुवातीच्या कलांमध्ये महागठबंधन आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र निकाल एनडीएच्या बाजूने लागला. दरम्यान महागठबंधन आणि एनडीएच्या स्पर्धेत बिहारमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवला. दरम्यान, बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली.

ओवेसी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी “पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचे आमचे डिपॉझिटही जप्त झाले होते. आमचा सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले. जनतेने आम्हाला मतदान केले आणि प्रेम दिले. आम्हाला पुढे अजूनही मेहनत करायची आहे,” असेही ओवेसी म्हणाले.

“आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीने तुरूंगात टाकले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे. निर्णयापूर्वी आम्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“बिहारमध्ये आम्ही यापूर्वी आरजेडीच्या लोकांशी बोलणी केली होती. आम्ही प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी काही मान्य केलं नाही. बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार. मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू असे जो पक्ष समजतो ते दिवस आता निघून गेले. तुम्हाला काम करावे लागेल आणि लोकांचे मनही जिंकावं लागेल,” असे ओवेसी म्हणाले.

“आम्हाला भाजपाची टीम बी म्हटले जाते यावर आमचा आक्षेप आहे. आम्हाला टीम बी बनवा असे मी सांगतो. जेवढे आमच्यावर तुम्ही आरोप कराल तेवढाच आमचा आत्मविश्वास वाढेल. लोकांनी आमच्या पक्षाची साथ दिली आहे. जेव्हा मी १३ वर्षांचा होतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक आमच्या घरावर ओवेसी कब्रिस्तान या पाकिस्तान असे म्हणून पळून जायचे. आम्ही हे यापूर्वीपासून ऐकत आलो आहोत. आम्ही चांगले काम करतोय म्हणूनच आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत,” असेही ओवेसी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.