नागपूर: करोनाची लागण झालेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. राज्य पोलीसांच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केला. करोना विषाणूचा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्यास त्याला पोलीस कल्याण निधीतून तत्काळ 1 लाख रुपये तत्काळ मंजूर करावे, असे निर्देश सर्व युनिट कमांडरना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी नुकतेच एका व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान युनिट कमांडरना यासाठीच्या तोंडी सूचना यापूर्वीच दिल्या होत्या.
राज्यात आठ अधिकऱ्यांसह किमान 37 पोलिस कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी बहुतेकजण मुंबईतील आहेत. लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळेच त्यांनाही करोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 20,000 अधिकारी आणि सुमारे 2.2 लाख कर्मचारी आहेत.