पाटणा – बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने देशात जातीय सलोख्याचा आदर्श समोर ठेवला आहे. राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात बांधल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या ‘विराट रामायण’ मंदिरासाठी मुस्लीम कुटुंबाने 2.5 कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.
पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सोमवारी येथे पत्रकारांना ही माहिती दिली. गुवाहाटी येथे राहणारे पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केल्याचे त्यांनी सांगितले.
खान आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिलेली देणगी दोन समाजातील सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे आचार्य म्हणाले. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असेही ते म्हणाले.
या मंदिराच्या उभारणीसाठी महावीर मंदिर ट्रस्टला आतापर्यंत १२५ एकर जमीन मिळाली आहे. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा उपलब्ध होणार आहे.
विराट रामायण मंदिर हे कंबोडियातील 215 फूट उंच असलेल्या 12व्या शतकातील जगप्रसिद्ध अंगकोर वाट संकुलापेक्षा उंच असल्याचे म्हटले जाते. पूर्व चंपारणच्या संकुलात उंच शिखरांसह 18 मंदिरे असतील आणि येथील शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे. या मंदिरांच्या बांधकामाचा एकूण खर्च अंदाजे 500 कोटी रुपये आहे.