नैसर्गीक मृत्यूचा आरोपीचा बनाव
राहुरी – तालुक्यातील तांभेरे येथील राजेंद्र गोविंद लांडे (वय 45) या व्यसनी मुलाने आईचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आईचे निधन झाल्याचे पाहुण्यांना सांगत अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच डीवायएसपी राहुल मदने सह राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी राजेंद्र लांडे यास तत्काळ अटक केली.
राजेंद्र लांडे हा आई इंदुबाई लांडे ( वय 70) यांच्याबरोबर राहत होता. राजेंद्र हा व्यसनाधीन होता. या व्यसनामुळे आरोपीस बायकोही सोडून गेली होती. मध्यरात्री राजेंद्रने आईच्या डोक्यात, पोटावर फुकणीच्या सहाय्याने मारहाण केली. त्यामध्ये इंदुबाई लांडे जागीच मृत्यूमुखी पडल्या. राजेंद्र लांडे याने आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप पाहुण्यांना कळविला. इंदुबाईचा खून झाल्याचे पाहुण्यांच्या लक्षात आले. पाहुण्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना याबाबत माहिती दिली. देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन अंत्यविधीस मज्जाव करीत आरोपीस अटक केली.