नवी दिल्ली – अदानी समुहाच्या घोटाळ्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यात कोर्टाने या प्रकरणात फोर्ब्सने प्रकाशित केलेली नवीन माहिती समाविष्ट करावी अशी एका याचिकाकर्त्याने केलेली मागणी कोर्टाने मान्य करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठाकडे एका याचिकाकर्त्याने आज ही मागणी केली होती.
ही माहिती रेकॉर्डवर घ्यावी अशी त्यांची सुचना होती पण कोर्टाने त्यास नकार दिला. या आधी कोर्टाने या प्रकरणी केंद्र सरकारची तज्ज्ञांच्या समितीबाबतची सीलबंद सुचना स्वीकारण्यास नकार दिला होता. या सुनावणीत आम्ही संपुर्ण पारदर्शकता बाळगणार आहोत त्यामुळे आम्हीं सरकारची ही सीलबंद सुचना किंवा पाकिटात बंद करून समिती सदस्यांची नावे सुचवण्याची पद्धत मान्य करणार नाही असे सरकारला सुनावले होते.
त्या पाठोपाठ त्यांनी आज एका याचिकाकर्त्यालाहीं त्याने नव्याने दाखल केलेली फोर्ब्सची माहिती रेकॉर्डवर घेण्यास नकार दिला आहे. अदानी समुहाने अब्जावधींच्या विदेशातील शेअरतारण व्यवहाराची माहिती भारतीय बॅंकांपासून लपवून ठेवली असल्याचे फोर्ब्सच्या एका अहवालात म्हटले आहे.