नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना रणावत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, त्यांचे पक्षात स्वागतच आहे. मात्र पक्षाच्या नियमांनुसार त्यांच्याशी वागणूक असेल. अगोदर पक्षात या. मग तुम्हाला कोणती जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून हेमा मालिनी यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी दिली जाण्याची पतंगबाजी झाल्यावर आता हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्यांना लोकसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना स्वत: कंगनाने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच पक्षाची इच्छा असेल तर आपण लोकसभेची निवडणूक लढण्यासही तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर नड्डा यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.