विविधा : डॉ. लक्ष्मण देशपांडे

-माधव विद्वांस

“वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे लेखक व सादरकर्ते बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची आज जयंती. 

त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला. ते लहानपणापासूनच गणपती उत्सवातील मेळ्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचे. एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालय व सरस्वती भूवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर वर्ष 1980 मध्ये औरंगाबाद विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.

याच दरम्यान त्यांनी “वऱ्हाड निघालय लंडनला’ या विनोदी एकपात्री नाटकाचे लेखन व निर्मिती केली. गावाकडच्या लोकांचा भाबडेपणा तसेच इरसाल व्यक्‍तिमत्त्वांचा व लग्न समारंभातील मानपानाच्या घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता करता त्यांना ही कल्पना सुचली आणि हे विनोदी नाटक त्यांनी लेखणीतून आणि मंचावर जीवंतपणे उभे केले.

भारतातील मराठमोळ्या खेड्यातील तरुण लंडनला जातो. तेथील एका मुलीच्या प्रेमात पडतो. तिचे वडील तिला लग्न करण्यास संमती देतात. गावाकडून वऱ्हाड लंडनला जाते. गावाकडील माणसे, त्यांची भाषा व तेथील वातावरणात घडणारे समारंभातील विनोदी प्रसंग यावर हे नाटक आधारित आहे. तीन छोटे दिवे, तीन माइक आणि एक पंचा एवढ्या साधनावर त्यांनी नाटकातील 52 पत्रे साकारून नाट्यसृष्टी अंगाला वेगळा यशस्वी प्रयोग साकारला. ग्रामीण भागातील वऱ्हाडी आणि मराठवाड्यातील भाषेच्या ठसक्‍यातील विनोद यामुळे हे नाटक प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले.

वर्ष 1979 मध्ये ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी केला होता. “वऱ्हाड’ भारतात तर पोचले होतेच; पण ते सातासमुद्रापार अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, मस्कत, दुबई, कतार, थायलंड अशा देशांतून जगभर पोचले. या नाटकाचे 1900 पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्‍वविक्रम त्यांच्या नावावर आहे. वर्ष 2001 मध्ये एकाच अभिनेत्याकडून 52 पात्रे साकारण्याच्या त्यांच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली. त्यांचे पश्‍चात अभिनेते संदीप पाठक आता हे प्रयोग करीत आहेत.

या व्यतिरिक्‍त रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला. तसेच अनुया दळवी यांच्या समवेत त्यांनी द्विपात्री “नटसम्राट’ या नाटकातही काम केले. 2000 साली “वऱ्हाड’करांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नाटकांव्यतिरिक्‍त “मौलाना आझाद-पुनर्मूल्यांकन’ या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “अक्षरनाद’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले. वर्ष 2003 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कलावंत पुरस्काराने तसेच विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे “साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ही त्यांना प्रदान करण्यात आला. चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रात स्थिर होताना पुणे आणि मुंबई येथून कामाची पावती मिळाली तरच या क्षेत्रात प्रभाव पडतो, हा समजही त्यांनी खोडून काढला. 22 फेब्रुवारी 2009 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.