62 वर्षापूर्वी प्रभात : रशियाने चंद्रावर अग्निबाण सोडला

ता. 5, माहे डिसेंबर, सन 1958

रशियन भाषेत “1857चा उठाव’ संबंधीची लोकगीते 

मॉस्को, ता. 4 – 1857 च्या उठावासंबंधी भारतीय लोकगीतांचा रशियन भाषेतील संग्रह सोव्हियत प्राच्य विद्याभ्यास संस्थेने प्रसिद्ध केला आहे. ज्यात पी. सी. जोशी यांनी संग्रहित केलेली सुमारे 50 गाणी असून ती त्यांनी या संस्थेला प्रसिद्धीसाठी दिलेली आहेत. काही गाणी वेळोवेळी विविध नियतकालिकात प्रसिद्ध झालेली आहेत. सुरजमल व जवालराम यांनी केलेल्या कविताही त्यात आहेत. या सर्व कविता व गाणी रशियामध्ये प्रथमच प्रसिद्ध होत आहेत.

रशियाने चंद्रावर अग्निबाण सोडला

वॉशिग्टन – रशियाने चंद्राला वळसा घालून मंगळाकडे जाणारा अग्निबाण सोडल्याचे वृत्त समजताच प्रे. आयसेन हॉवर यांनी अमेरिकन अंतरिक्ष तज्ज्ञ मंडळाची बैठक आज तातडीने बोलावली आहे. मिटस्‌की येथे परवा रात्री “मिसाइल्स अँड रॉकेट्‌स’ या मासिकाचे संपादक इरिक घरगौस्ट यांनी यासंबंधीचे वृत्त सांगितले. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकन शास्त्रज्ञांना रेडियोद्वारे या रशियन अग्निबाणाची हालचाल दिसली.

भूकेल्या 4000 लोकांची बाजारपेठेत धाड

रिओ द जानेरो – सतत दोन वर्षे अवर्षणाच्या आपत्तीत सापडल्याने अन्नान्नदशा झालेल्या सुमारे 4000 लोकांनी ब्राझीलच्या ईशान्येस असणाऱ्या कॅनांदी शहरातील बाजारपेठेवर हल्ला करून लुटालूट केली. घराघरांत शिरून आणि दुकानांत घुसून त्यांनी लुटालूट केली. मेयरने फेडरल सरकारकडे लष्कराची मदत मागितली आहे.

साखर कारखान्यासाठी यंत्रसामग्री देशातच तयार करण्याची योजना 

नवी दिल्ली – साखर कारखान्याची यंत्रसामग्री देशातच बनविण्यासाठी कारखानदारांची सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्नशेती मंत्री श्री. जैन यांनी आज लोकसभेत सांगितली. येत्या दोन वर्षांत ह्या संस्थेद्वारे यंत्रसामग्री बनविण्याचे कार्य चालू होईल, असेही ना. मंत्र्यांनी सांगितले.

द. आफ्रिकेतील हिंदी लोकांचा छळ ः राजकीय समितीतील ठराव

न्यूयॉर्क – द. आफ्रिकेतील हिंदी लोकांना देण्यात येणाऱ्या पक्षपाती वागणुकीसंबंधी आज राजकीय समितीत मांडण्यात येणारा ठराव मंजूर होण्याचा संभव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.